Kokan  

पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना

banner 468x60

मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांच्या विविध प्रश्नांना एकत्रित व्यासपीठ मिळणार आहे. आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी, भंडारी आणि बारा बलुतेदार समाजासह शेतकरी, मच्छिमार आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना करण्यात येणार आहे.

या महासंघाचा स्थापना सोहळा २९ सप्टेंबर २०२६ रोजी ठाणे पश्चिम येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.

एमएमआर परिसरात वेगाने होत असलेल्या शहरीकरण आणि विविध पायाभूत प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या जमीन, गावठाणे, कोळीवाडे, घरे, पारंपरिक व्यवसाय, रोजगार आणि पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होत असल्याचे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सिडको, एमएमआरडीए, एमआयडीसी, जेएनपीए, बुलेट ट्रेन, वसई-विरार-अलिबाग कॉरिडॉर, कोस्टल रोड आणि वाढवण बंदर यांसारख्या प्रकल्पांच्या संदर्भातील स्थानिक प्रश्नही महासंघाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत.

गावठाणे, कोळीवाड्यांच्या प्रश्नांवर भर

शहरीकरणाच्या प्रक्रियेत पारंपरिक गावठाणे आणि कोळीवाड्यांमधील नागरिकांना घरांची पुनर्बांधणी, परवानग्या आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा महासंघाने केला आहे. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी सुलभ धोरण आणि शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि मच्छिमारांचे प्रश्न

विविध विकास प्रकल्पांमुळे प्रभावित होणाऱ्या शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, पुनर्वसन, रोजगार आणि स्थानिक सहभाग मिळावा, यासाठी सामूहिक भूमिका घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सागरी पर्यावरणाचे संरक्षण, खाड्या आणि जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे तसेच पारंपरिक मच्छिमारी आणि मच्छिमारांची उपजीविका सुरक्षित ठेवण्याच्या मुद्द्यांवरही महासंघ काम करणार आहे.

स्थानिक युवकांसाठी रोजगार, शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी

एमएमआरमध्ये निर्माण होणाऱ्या उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक युवकांना अधिकाधिक सहभागी करून घेण्यासाठी कौशल्यविकास, शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेसाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची भूमिका महासंघ मांडणार आहे. स्थानिक नागरिकांच्या वीज वितरण, वाढीव वीजबिले आणि ग्राहक तक्रारींसारख्या प्रश्नांवरही संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

दि. बा. पाटील यांच्या नावाचा मुद्दाही अजेंड्यावर

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर करून केंद्राकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर निर्णय व्हावा, अशी भूमिपुत्रांची भूमिका महासंघाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.

सुरेश ‘बाळ्यामामा’ म्हात्रे यांच्या पुढाकारातून स्थापना

सागरी भूमिपुत्रांचे विविध प्रश्न एका व्यासपीठावर आणण्यासाठी खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या पुढाकारातून महासंघाची स्थापना होत आहे. विविध समाजांच्या संस्था आणि संघटनांना एकत्र आणून लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने भूमिपुत्रांच्या प्रश्नांसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा महासंघाचा मानस आहे.

स्थापना सोहळ्यास बालयोगी सदानंद महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच पद्मविभूषण शरदचंद्र पवार आणि पद्मश्री लक्ष्मण माने यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. सागरी भूमिपुत्रांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाबद्दल पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना ‘विशेष सागरी रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

पाचही सागरी जिल्ह्यांतील आजी-माजी भूमिपुत्र आमदार तसेच राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधीही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

‘पाच सागरी जिल्हे — एक भूमिपुत्र समाज — एक व्यासपीठ — एकजूट’ या भूमिकेतून विविध समाज, संस्था, संघटना, शेतकरी, मच्छिमार, प्रकल्पग्रस्त, युवक आणि महिलांनी महासंघात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमस्थळ : राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे पश्चिम
दिनांक : २९ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *