राजापूर तालुक्यात शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल १२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, शासकीय योजनांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांपासून सावध राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने पंचायत समितीकडे घरघंटी (घरगुती गिरणी) मिळण्यासाठी अधिकृत अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत एक अनोळखी व्यक्ती घरघंटी घेऊन तिच्या घरी पोहोचला. आपण लांजा येथून आलो असल्याचे सांगत त्याने शासनाकडून मंजुरी मिळाल्याचा दावा केला. काही दिवसांत अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर त्यातील काही पैसे आम्हाला द्यायचे आहेत, असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला.
विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीने कोणतेही ओळखपत्र, अधिकृत मंजुरीपत्र, बिल, पावती किंवा शासनाकडील कोणताही कागदपत्रीय पुरावा दाखवला नाही. तरीही शासकीय योजनेचा लाभ मिळत असल्याच्या विश्वासातून महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला.
काही दिवसांनी महिलेच्या बँक खात्यात १७ हजार रुपये जमा झाले. ही माहिती मिळताच तोच व्यक्ती पुन्हा महिलेच्या घरी आला. वारंवार मागणी करत आणि दबाव टाकत त्याने खात्यातील १२ हजार रुपये काढून देण्यास भाग पाडले. महिलेनेही त्याच्या सांगण्यावरून १२ हजार रुपये त्याच्या स्वाधीन केले.
पैसे घेतल्यानंतर, “आमचा माणूस लवकरच येऊन घरघंटी बसवेल आणि तिची संपूर्ण माहिती देईल,” असे सांगून तो व्यक्ती निघून गेला. मात्र, त्यानंतर तब्बल तीन महिने उलटूनही तो पुन्हा परतला नाही. घरघंटी बसवण्यासाठीही कोणी आले नसल्याने ती आजही घरातच पडून आहे.
या प्रकारामुळे संबंधित महिलेसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. घरघंटीची वॉरंटी कोण देणार, ती सुरू कशी करायची, दुरुस्ती कुठे करायची आणि नेमका हा व्यवहार अधिकृत होता की फसवणूक, याबाबत संभ्रम कायम आहे. या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबातही तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आर्थिक फटका बसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी शासकीय योजनांच्या नावाखाली कोणतीही रक्कम मागणाऱ्या व्यक्तींवर आंधळा विश्वास ठेवू नये. कोणतेही बिल, पावती, ओळखपत्र किंवा अधिकृत आदेश नसताना पैसे देऊ नयेत. तसेच अशा प्रकारची शंका आल्यास पंचायत समिती, संबंधित शासकीय विभाग किंवा पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













