रत्नागिरी : हातखंबा येथे शासकीय मोरी बुजवून खासगी रस्ता करण्याचा प्रयत्न, NHAI ची जमीनमालकाला नोटीस!

banner 468x60

रत्नागिरी मिऱ्या-नागपूर (रत्नागिरी-कोल्हापूर) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील हातखंबा तिठा येथे शासकीय बॉक्स मोरीमध्ये माती टाकून ती बुजवत खासगी जागेत जाण्यासाठी रस्ता तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दखल घेत संबंधित जमीनमालक रणजीत अमित देसाई यांना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत नोटीस बजावली आहे. बेकायदेशीर काम तात्काळ थांबवून मोरी पूर्ववत करण्याचे निर्देश या नोटिशीद्वारे देण्यात आले आहेत. दरम्यान, कारवाईसाठी पथक घटनास्थळी पोहोचताच संबंधित जेसीबी चालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हातखंबा तिठा परिसरातील कांबळे यांच्या वस्तीच्या जवळ हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. संबंधित जमीनमालकाने जेसीबीच्या सहाय्याने राष्ट्रीय महामार्गावरील बॉक्स मोरीच्या बोगद्यात माती टाकून स्वतःच्या खासगी जागेत जाण्यासाठी अनधिकृत रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन या कामाला आक्षेप घेतला. नागरिकांनी विरोध केल्यानंतर दिवसा काम थांबवण्यात आले. मात्र, त्यानंतर रात्रीच्या वेळी पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने मोरीत माती टाकण्याचे काम करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित मोरीच्या परिसरातील खोलगट भागात वाहनांची सुरक्षितता आणि मोरीला संभाव्य धक्का बसू नये, यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून माती टाकण्यात आली होती. याच मातीचा वापर करून मोरीचा बोगदा बुजवण्यात आल्याचा मुद्दाही समोर आला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील बॉक्स मोरी ही पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यासाठी महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. या मोरीत माती टाकून ती बुजवल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळ्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी परिसरात पाणी साचून स्थानिक वस्त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच महामार्गाच्या सुरक्षिततेवर आणि पायाभूत सुविधांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

NHAI ने बजावलेल्या नोटिशीतही पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाल्याने महामार्गाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची तसेच परिसरात पाणी साचून अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता अधोरेखित करण्यात आली आहे.

२९ ऑक्टोबर रोजी महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी अनिल सिंग, कनिष्ठ अभियंता ललित, पीएमसी ‘टीपीएफ गेटिन्सा युरोइस्टुडिओ’चे प्रतिनिधी आणि संबंधित ठेकेदार कंपनीचे पथक कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले होते.

यावेळी पथकासोबत पोलिसांचे वाहनही घटनास्थळी पोहोचले. हे पाहताच जेसीबी चालक संतोष वासुदेव राठोड याने जेसीबीसह विरुद्ध दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. महामार्गावर काही काळ पाठलागाचा प्रकार घडला. अखेर हातखंबा वाहतूक मदत केंद्राच्या पोलिसांनी जेसीबी चालकाला ताब्यात घेतले.

संबंधित जेसीबीवर अधिकृत ई-चलन करण्यात आले असून मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जागेवर दंड वसूल न करता ते न्यायालयात पाठवले आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणातील पुढील निर्णय न्यायालयाच्या स्तरावर होणार आहे.

या संपूर्ण प्रकारात राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीच्या भूमिकेवरही स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान रस्ता, मोऱ्या आणि अन्य पायाभूत सुविधांची सुरक्षा राखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदार कंपनीवर असते.

दिवसा स्थानिकांनी विरोध करून काम थांबवले असताना रात्री पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने मोरी बुजवण्याचे काम कसे सुरू झाले? संबंधित कंपनीच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आला नव्हता का? कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप का केला नाही? असे सवाल उपस्थित होत आहेत.

संबंधित जमीनमालकाच्या परिसरात ठेकेदार कंपनीकडून मातीचा साठा करण्यात आल्याचाही मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला आहे. या सर्व बाबींची चौकशी करून कंत्राटदार कंपनीच्या जबाबदारीची निश्चिती करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, या आरोपांबाबत कंपनीची अधिकृत भूमिका समोर येणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

मोरीजवळील मातीचा ढीग हटवण्याची मागणी

NHAI च्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बेकायदेशीर कामाला आळा घातला असला तरी मोरीच्या मुखाजवळील मातीचा ढीग अद्याप पूर्णपणे हटवण्यात आलेला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा मातीचा ढीग पूर्णपणे बाजूला करून मोरीतील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याशिवाय स्थानिकांच्या सोयीसाठी असलेला बायपास रस्ता उखडलेला असल्याने त्याचीही तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक गोविंद पी. भैरव यांनी संबंधित जमीनमालकाला नोटीस बजावली असून, या नोटिशीची प्रत रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडूनही गंभीर दखल

राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय मोरी बुजवण्याच्या या प्रकाराची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनीही गंभीर दखल घेतली. प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठवले. तसेच संबंधित यंत्रणांनी या बेकायदेशीर कृत्याची दखल घेऊन नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश दिल्याची माहिती आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणातील पुढील प्रशासकीय कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जमीनमालकासह कंत्राटदाराच्या जबाबदारीचीही चौकशी व्हावी!

हातखंबा येथील या प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय पायाभूत सुविधांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासगी मालमत्तेत जाण्यासाठी सार्वजनिक वापराच्या मोरीमध्ये माती टाकून पाण्याचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप गंभीर आहे. त्यामुळे संबंधित जमीनमालकावर नियमानुसार कारवाई करण्याबरोबरच या प्रकारात कंत्राटदार कंपनीची काही जबाबदारी होती का, याचीही चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मोरीतील माती पूर्णपणे हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करणे, स्थानिक वस्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि बायपास रस्त्याची दुरुस्ती करणे या बाबींना प्राधान्य देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी आणि NHAI यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने आता प्रत्यक्षात कोणती कारवाई होते आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर संबंधित यंत्रणांचा अंकुश कितपत प्रभावी ठरतो, याकडे हातखंबा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *