Breaking News
संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू दापोली : आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा धोका, पर्यटकांना सावधगिरीचे आवाहन, हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांनाही सतर्कतेच्या सूचना चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित

संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील कडवई व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आधारवड ठरलेले कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या असुविधा आणि समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. या आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब जागोजागी कोसळून लोखंडी सळ्या बाहेर आल्याने इमारत अत्यंत धोकादायक बनली आहे.

त्यातच, सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरलेली आणि मोफत रक्त व इतर तपासण्या करणारी ‘महालॅब’ १ नोव्हेंबरपासून अचानक बंद करण्यात आल्याने पंचक्रोशीतील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कडवईसह तुरळ, चिखली, रांगव, शेणवडे आणि मासरंग या गावांतील शेकडो रुग्ण उपचारांसाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेमुळे सर्वसामान्यांना मोफत वैद्यकीय उपचार मिळतात, ज्यामुळे त्यांचा मोठा आर्थिक भार हलका होतो. रुग्णांच्या सोयीसाठी शासनाच्या वतीने येथे महालॅब सुरू करण्यात आली होती. खासगी लॅबमध्ये हजारो रुपये खर्चून कराव्या लागणाऱ्या तपासण्या येथे मोफत होत असल्याने रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचत होता. मात्र, प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून ही महालॅब अचानक बंद केल्याने रुग्णांची मोठी गैरसोय निर्माण झाली असून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

दुसरीकडे, या आरोग्य केंद्राच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. छताचा स्लॅब ठिकठिकाणी कोसळत असून आतील गंजलेल्या सळ्या स्पष्टपणे दिसत आहेत. हा स्लॅब कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने उपचारासाठी येणारे रुग्ण आणि कर्तव्य बजावणारे आरोग्य कर्मचारी यांचा जीव टांगणीला लागला आहे. काही वर्षांपूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते, मात्र ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप त्यावेळी ग्रामस्थांनी केला होता.

या गंभीर परिस्थितीबाबत बोलताना वैद्यकीय अधिकारी संतोष यादव यांनी आरोग्य केंद्राची लॅब बंद असल्याचे मान्य केले असून, इमारतीचा स्लॅब वारंवार कोसळत असल्याने रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे. तर, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी गेल्या पाच वर्षांत या इमारतीवर कोणताही निधी खर्च झाला नसल्याचे सांगत, इमारत धोकादायक झाल्याने ती नव्याने बांधणे गरजेचे असून त्यासाठी शासनाकडे रीतसर प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. आता प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आणि ही महालॅब पुन्हा कधी सुरू होणार, याकडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.