Breaking News
दापोली : विषारी औषध प्राशन केलेल्या 30 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, साखळोली गणेशवाडीतील दुर्दैवी घटना मंडणगड : हाप्रळ-आंबेत पुलाला बार्जची धडक, 11 दिवसांनी बार्ज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अतिवृष्टीचा इशारा असतानाही सुरक्षिततेकडे दुर्लक्ष गुहागर : मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या प्रमोद कांबळे यांचा माळरानावर हाडांचा सांगाडा, तालुक्यात खळबळ दाभोळ : वणौशी तर्फे पंचनदीत ‘महाविस्तार AI’ अ‍ॅपचे प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांचा डिजिटल शेतीला उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरीच्या भावेश चव्हाणची राष्ट्रीय पातळीवर चमक, Re-NEET UG 2026 मध्ये ST प्रवर्गात राज्यात प्रथम, देशात चौथा

मंडणगड : हाप्रळ-आंबेत पुलाला बार्जची धडक, 11 दिवसांनी बार्ज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अतिवृष्टीचा इशारा असतानाही सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

banner 468x60

मंडणगड येथील सावित्री नदीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला ६ जुलै रोजी पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या बार्जची धडक बसल्याप्रकरणी अखेर ११ दिवसांनी बार्ज मालकाविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी व सावित्री नदीला पूर येण्याचा इशारा दिला असतानाही बार्ज सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना न केल्याने ही गंभीर घटना घडल्याचा ठपका फिर्यादीने ठेवला आहे.

banner 728x90

या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०/२०२६ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३२४(५), २८९ तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८४ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद ओंकार अशोक शिरगांवकर (वय ३१), कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, माणगाव यांनी दिली असून, रशाद अहमद मुजावर (रा. गॉडगिफ्ट टॉवर, हिल रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई) यांना आरोपी करण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील मौजे सापे येथील सर्व्हे क्रमांक ३९/२ लगत तीन बार्ज – MV AL SUBHAANI, MV DULDUL VI आणि MV ZOYA – नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, ६ जुलै रोजी पहाटे अतिवृष्टीमुळे सावित्री नदीला आलेल्या पुराच्या प्रचंड प्रवाहामुळे बार्जला बांधलेले दोरखंड तुटले आणि नांगरही वाहून गेला. परिणामी तिन्ही बार्ज नियंत्रणाबाहेर गेल्या.

यापैकी MV AL SUBHAANI ही बार्ज म्हाप्रळ-आंबेत पुलाखालून वाहत जाऊन खाडीकिनारी अडकली. तर MV DULDUL VI आणि MV ZOYA या दोन बार्ज पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास म्हाप्रळ-आंबेत पुलाला जोरदार धडकल्या. या धडकेमुळे पुलाचे नुकसान झाले तसेच सरकारी मालमत्तेची हानी झाली. याशिवाय पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण झाला होता.

तपासात बार्ज मालकाने हवामानाचा इशारा मिळूनही बार्ज सुरक्षित स्थळी हलविणे, दोरखंड व नांगराची मजबुती तपासणे किंवा अन्य कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याचे समोर आले आहे. या निष्काळजीपणामुळेच पुलाला नुकसान झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता, महाड तसेच उपविभागीय अभियंता, माणगाव यांनी १५ जुलै २०२६ रोजी पोलिसांकडे कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्र पाठविले. त्या पत्राच्या आधारे १७ जुलै २०२६ रोजी दुपारी १.१७ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सावित्री नदीवरील हा पूल रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *