मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलाअलीकडील उतारावर शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या कंटेनरने हातखंबा वाहतूक शाखेच्या (टॅप) शासकीय पोलीस वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात पोलीस वाहन नदीच्या दिशेने खोल उतारावर जाऊन पलटी झाले, तर कंटेनरही रस्त्यालगत उलटला. या दुर्घटनेत दोन पोलीस अंमलदारांसह कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा वाहतूक शाखेचे शासकीय वाहन (क्रमांक MH 08 BE 3561) अंजनारी पुलाजवळील उतारावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरने (क्रमांक RJ 09 GE 2397) पोलीस वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, पोलीस वाहन महामार्गावरून खाली नदीच्या दिशेने असलेल्या खोल उतारावर जाऊन उलटले. या अपघातात कंटेनरही रस्त्याच्या बाजूला पलटी झाला.

या दुर्घटनेत कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार शिंगाडे आणि सहाय्यक पोलीस फौजदार संतोष गायकवाड हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, कंटेनर उलटल्याने त्याचा चालक केबिनमध्ये अडकला. त्यालाही गंभीर दुखापत झाली असून, त्याला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी बचावकार्य राबवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक सानप यांच्यासह लांजा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले.
या भीषण अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













