दापोली : प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांचा शिवसेना शहरप्रमुख पदाचा अखेर राजीनामा रेळेकर यांना कथित ऑडिओ क्लिप भोवली

banner 468x60

दापोलीच्या राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे. दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी शहरप्रमुख पदाचा राजीनामा काल 11 ऑगस्टला शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आणि दापोली तालुका प्रमुख आणि सभापती उन्मेष राजे यांच्याकडे दिला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर पक्षांतर्गत पातळीवर घडलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर रेळेकर यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

banner 728x90

रामदास कदमांची थेट कानउघडणी

या कथित ऑडिओ क्लिपचे पडसाद पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरही उमटल्याची माहिती समोर आली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांना फोन करून त्यांची कानउघडणी केल्याचे सांगितलं.

याबाबत माजी मंत्री रामदास कदम यांनी ‘कोकण कट्टा न्यूज’चे संपादक तेजस बोरघरे यांच्याशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

“मी कॉल करून त्याची पूजा केली. रामदास कदमांच्या भाषेत मी सांगितलं काय सांगायचं ते. त्याचे पाय मी जमिनीवर आणले,” अशा शब्दांत रामदास कदम यांनी रेळेकर यांना खडसावल्याचे सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून दापोलीतील राजकीय वर्तुळात या कथित ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सुरू होती. या क्लिपमध्ये ई-शिवाई इलेक्ट्रिक बसच्या कर्मचाऱ्यांशी धमकीवजा भाषेत संभाषण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या कथित संभाषणात राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणाची राजकीय चर्चा आणखी रंगली.

व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये “माझा आदेश म्हणजे योगेश कदमांचा आदेश” तसेच “माझा आदेश म्हणजे शिवसेना पक्षाचा आदेश” अशा आशयाचे वक्तव्य ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्याला “तुला सगळ्या स्टाफसकट जाळेन” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप या कथित संभाषणातून करण्यात आला आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली असून, पक्षांतर्गत पातळीवरही या प्रकरणाची दखल घेतली गेली.

अखेर शहरप्रमुख पदाचा राजीनामा

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर त्यांच्या शहरप्रमुख पदावरून बदल होण्याची शक्यताही यापूर्वी व्यक्त केली जात होती.

आता रेळेकर यांनी शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे कथित ऑडिओ क्लिप रेळेकर यांना राजकीयदृष्ट्या भोवली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नव्या शहरप्रमुखासाठी दापोलीत हालचाली

रेळेकर यांच्या राजीनाम्यानंतर आता दापोली शिवसेनेच्या नव्या शहरप्रमुखाच्या नियुक्तीसाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘कोकण कट्टा न्यूज’ला मिळालेल्या माहितीनुसार, नव्या शहरप्रमुखाच्या नियुक्तीबाबत दापोलीत पक्षाच्या पातळीवर बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. शहरप्रमुख पदासाठी संभाव्य नावांवर चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.

मात्र, नव्या शहरप्रमुखाच्या नावाबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

नेमका वाद कशावरून?

मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण वाद दापोलीतील ई-शिवाई इलेक्ट्रिक बसच्या चालकांच्या ड्युटी नियोजनावरून सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

तीन चालकांच्या ड्युटी लावण्याच्या मुद्द्यावरून संबंधित कर्मचारी आणि कथित ऑडिओमधील व्यक्ती यांच्यात संभाषण झाल्याची माहिती समोर येत आहे. ड्युटी कोणाची, कोणत्या मार्गावर आणि कोणत्या पद्धतीने लावायची, यावरून सुरुवातीला निर्माण झालेला वाद पुढे धमकीवजा संभाषणापर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे.

दापोलीतील इलेक्ट्रिक शिवाई बसचे कंत्राट मोरया ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बस कर्मचाऱ्यांच्या ड्युटी नियोजनाचा विषय हा संबंधित कंत्राटदार कंपनीच्या प्रशासकीय कार्यक्षेत्राशी संबंधित असल्याचेही बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर एका राजकीय पदाधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांशी अशा प्रकारे संवाद साधणे योग्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

योगेश कदमांच्या नावाच्या उल्लेखाने राजकीय चर्चेला उधाण

या कथित ऑडिओ क्लिपमधील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे मंत्री योगेश कदम यांच्या नावाचा करण्यात आलेला उल्लेख.

“माझा आदेश म्हणजे योगेश कदमांचा आदेश” असा दावा करण्यात येत असल्याने या प्रकरणाला थेट राजकीय संदर्भ प्राप्त झाला. तसेच “माझा आदेश म्हणजे शिवसेना पक्षाचा आदेश” अशा आशयाचे वक्तव्य असल्याचा दावाही केला जात आहे.

या वक्तव्यांमुळे दापोलीतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तसेच विरोधी राजकीय पक्षांमध्येही चर्चेला उधाण आले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत ‘कोकण कट्टा न्यूज’ने मंत्री योगेश कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

सोशल मीडियावर कथित ऑडिओची जोरदार चर्चा

कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दापोलीत त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि कर्मचाऱ्यांना धमकी दिल्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेकडे लक्ष

रेळेकर यांच्या राजीनाम्यानंतर आता दापोली शिवसेनेत पुढील राजकीय समीकरणे काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नव्या शहरप्रमुखाची निवड कोणाच्या नावावर होते, कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर पक्ष नेतृत्वाची पुढील भूमिका काय असेल आणि या प्रकरणामुळे दापोलीतील शिवसेनेच्या स्थानिक संघटनात्मक राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, ‘कोकण कट्टा न्यूज’ या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता किंवा त्यातील आवाजाची स्वतंत्र पुष्टी करत नाही. या प्रकरणातील संबंधित प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर, मंत्री योगेश कदम किंवा इतर संबंधितांची अधिकृत भूमिका अथवा स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास तेही प्रसिद्ध करण्यात येईल.

मात्र, या राजीनाम्यामुळे दापोली शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *