दापोली तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जेलीफिश आढळून आल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जेलीफिशच्या संपर्कात आल्याने त्वचेवर ॲलर्जी, जळजळ आणि वेदना होण्याचे प्रकार समोर येत असून, सकाळपासून अशा त्रासाने बाधित झालेल्या रुग्ण समोर आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आंजर्ले समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असून, येथे मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रस्नान आणि जलक्रीडेचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, सध्या समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचे प्रमाण वाढल्याने समुद्रात उतरणे धोकादायक ठरू शकते. जेलीफिशच्या शरीरावरील विषारी तंतूंचा संपर्क त्वचेशी आल्यास तीव्र जळजळ, खाज, सूज आणि ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये गंभीर स्वरूपाच्या प्रतिक्रिया देखील उमटू शकतात.
त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिश दिसल्यास त्यांना स्पर्श करू नये. तसेच परिस्थिती सामान्य होईपर्यंत समुद्रात पोहण्यासाठी उतरणे टाळावे, असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हॉटेल व्यावसायिकांनाही सतर्कतेच्या सूचना
आंजर्ले परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट आणि होमस्टे व्यावसायिकांनी आपल्या ठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांना समुद्रातील जेलीफिशच्या संभाव्य धोक्याची माहिती द्यावी. पर्यटक समुद्रात उतरण्यापूर्वी त्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जेलीफिशच्या संपर्कात आल्यामुळे कोणाला त्वचेवर जळजळ, सूज किंवा अन्य त्रास जाणवल्यास तातडीने आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष नको!
आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिश आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी समुद्रात उतरण्याबाबत सावध भूमिका घ्यावी. स्थानिक प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पर्यटन व्यावसायिकांनीही पर्यटकांमध्ये जनजागृती करून आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













