दिवाळीच्या सणासुदीतच चिपळूण शहराचे उपनगर असलेल्या खेर्डीमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात नळाला पाणी येत नसल्याने घरगुती कामांसह दैनंदिन गरजांसाठी पाण्याची व्यवस्था करताना खेर्डीवासीयांची दमछाक होत आहे.
खेर्डी परिसरात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलकडे जाणारा पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मार्ग बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वीज निर्मिती बंद असल्याचाही पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खेर्डी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेला आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या परिस्थितीची माहिती मिळताच माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य विनोद भुरण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गाळ काढण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. जॅकवेलकडे जाणारा पाण्याचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच पाणीपुरवठा विस्कळीत होण्यामागील नेमक्या अडचणी जाणून घेतल्या.
दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहिल्याने खेर्डीवासीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गाळ काढण्याचे काम करताना ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
संबंधित यंत्रणांनी तातडीने समन्वय साधून जॅकवेलकडे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि खेर्डीचा पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













