घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून कुवे-वारीशेवाडी येथील अवघ्या २७ वर्षीय नवविवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हृदयद्रावक प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात पती, सासरे, दीर आणि सासू अशा चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे व क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभ्रा ऋषिकेश यादव (वय २७, रा. कुवे, वारीशेवाडी, ता. लांजा) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभ्रा हिचा विवाह १७ फेब्रुवारी २०२६ रोजी कुवे-वारीशेवाडी येथील ऋषिकेश प्रकाश यादव याच्याशी झाला होता. मात्र, विवाहानंतर अवघ्या काही महिन्यांतच पती ऋषिकेश प्रकाश यादव (२७), सासरे प्रकाश केशव यादव (६७), दीर अनमोल प्रकाश यादव (२५) आणि सासू सुवर्णा प्रकाश यादव (५५) यांनी संगनमत करून घराचे कर्ज फेडण्यासाठी शुभ्रा हिच्याकडे माहेरहून पैसे आणण्याची सातत्याने मागणी सुरू केली.
यासाठी तिला अत्यंत क्रूरतेची वागणूक देत तिचा अमानुष शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. सासरच्या या असह्य जाच आणि छळाला कंटाळून शुभ्रा हिने ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी आपल्या राहत्या घरात साडीने गळफास लावून घेतला. गळफास घेतलेल्या अवस्थेत तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास उपचारादरम्यान संपली.
या प्रकरणी मयताची बहीण तृप्ती भालचंद्र माजळकर (वय ३२, रा. गोंडेसखल रोड, लांजा) यांनी लांजा पोलिसांत दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून पोलिसांनी पती ऋषिकेश यादव, सासरे प्रकाश यादव, दीर अनमोल यादव आणि सासू सुवर्णा यादव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ८५, १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी सर्व आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम ३५(३) अन्वये कायदेशीर नोटीस बजावली असून, पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या गंभीर प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी संसार सुरू केलेल्या तरुणीचा अशा प्रकारे छळातून करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व संताप व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













