चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील मोहल्ला नंबर १ मधील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा आणि कमी-जास्त वीजदाबाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. परिसरातील थ्री-फेज वीजपुरवठ्याचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन थ्री-फेज वीजलाईनचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फिरोज कडवईकर यांनी केली आहे.
खडपोली मोहल्ला नंबर १ परिसरात वीजपुरवठ्याची समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी ठरत आहे. थ्री-फेज वीजपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे तसेच वीजदाबात चढ-उतार होत असल्याने घरगुती विद्युत उपकरणांच्या वापरात अडचणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घरातील पंखे सुरू असले तरी पुरेशा वेगाने फिरत नसल्याने अपेक्षित हवा मिळत नाही. याशिवाय फ्रिज, टीव्ही, मिक्सर यांसारख्या उपकरणांच्या वापरावरही वीजदाबातील चढ-उतारांचा परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उन्हाळ्यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल
उन्हाळ्याच्या दिवसांत उकाड्यामुळे या समस्येची तीव्रता अधिक जाणवते. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर इन्व्हर्टरचा आधार घ्यावा लागतो. मात्र, इन्व्हर्टरची क्षमता मर्यादित असल्याने त्यावर पंखे किती वेळ चालवायचे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होतो. त्यामुळे घरात पुरेशी हवा मिळत नसल्याने गैरसोय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दोन वर्षांपासून पाठपुरावा; तरीही प्रश्न सुटेना!
परिसरातील वीजसमस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, दोन वर्षे उलटूनही थ्री-फेज वीजलाईनचा प्रश्न प्रलंबित असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते फिरोज कडवईकर यांनी व्यक्त केली.
“खडपोली मोहल्ला नंबर १ मधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून विजेच्या समस्येला सामोरे जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून संबंधित यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. मात्र, अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महावितरणने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि थ्री-फेज वीजलाईनचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा,” अशी मागणी फिरोज कडवईकर यांनी केली आहे.
महावितरणने तातडीने लक्ष देण्याची मागणी
वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे नागरिकांना दैनंदिन कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच कमी-जास्त वीजदाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी खडपोली मोहल्ला नंबर १ येथे प्रत्यक्ष पाहणी करून वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणींचा शोध घ्यावा. आवश्यक दुरुस्ती आणि तांत्रिक उपाययोजना करून थ्री-फेज वीजलाईनचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
आता महावितरण या समस्येकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे खडपोली मोहल्ला नंबर १ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











