Breaking News
रत्नागिरी : पाली मराठवाडीत भरदिवसा घरफोडी, 6 लाख 8 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास दापोली : तीन दशकांच्या प्रबोधनात्मक लेखनाचा गौरव ! ज्येष्ठ लेखक माधव गव्हाणकर यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर परिवारातर्फे एक लाख रुपयांचा सन्मान, माधव गव्हाणकर यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल चिपळूण : तालुक्यातील खडपोली मोहल्ला नंबर 1 मध्ये विजेचा प्रश्न गंभीर; दोन वर्षांपासून थ्री-फेज वीजलाईनची प्रतीक्षा, महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न कायम रत्नागिरी : व्हॉट्सॲप पोस्टचा राग; रत्नागिरी एमआयडीसीत दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण, ‘पंचक्रोशी समाचार’ ग्रुपवरील पोस्टवरून वाद, कंपनीत घुसून मारहाण केल्याप्रकरणी चौघांसह अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल दापोली : आझाद मैदानात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तिघांविरोधात गुन्हे दाखल

रत्नागिरी : पाली मराठवाडीत भरदिवसा घरफोडी, 6 लाख 8 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील पाली मराठवाडी येथे भरदिवसा घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे तब्बल ६ लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. बुधवारी (७ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा ते पावणेदोनच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी अविनाश जाधव (वय ४५, रा. पाली मराठवाडी, ता. जि. रत्नागिरी) या बुधवारी गावातील आठवडा बाजारात भाजीपाला आणि घरातील आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

त्यानंतर चोरट्याने घरातील आतील दरवाजाचे बिजागर तोडून बेडरूममध्ये प्रवेश केला. तेथील लोखंडी गोदरेज कपाटाचे लॉकर उचकटून त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. अवघ्या काही वेळात चोरट्याने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे पैंजणही चोरीला

या घरफोडीत सुमारे ४ लाख १५ हजार रुपये किमतीच्या पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या प्लेन पाटल्या, ७० हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे वळे, ६० हजार रुपये किमतीची पांढऱ्या खड्याची सोन्याची अंगठी, ७० हजार रुपये किमतीचे सोन्याच्या वाट्या व मणी असलेले दोन पदरी मंगळसूत्र, गुलाबी खडा असलेला सोन्याचा बदाम, ३२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या रिंगा, १६ हजार रुपये किमतीची सोन्याची वेल, सोन्याची नथ तसेच सात हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण व जोडवी असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घरी परतल्यानंतर चोरी उघड

भाजीपाला आणि घरातील वस्तूंची खरेदी करून मीनाक्षी जाधव घरी परतल्या असता, घराच्या मागील बाजूच्या गेटचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील दरवाजा आणि कपाटाचे लॉकर उचकटलेले असल्याचे तसेच लॉकरमध्ये ठेवलेले दागिने गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

या घटनेनंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाली मराठवाडी येथे भरदिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. घर बंद करून बाहेर जाताना नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाले आहे. दरम्यान, चोरीतील दागिन्यांचा शोध घेणे आणि संबंधित चोरट्यांचा छडा लावणे यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *