रत्नागिरी : तब्बल ३४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मंडणगड पोलीस ठाण्यातील दोन फरार आरोपींना रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कर्नाटकातून अटक केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित ‘RAIDS App’ या तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपींच्या छायाचित्रांचे पुनर्निर्माण करून पोलिसांनी त्यांचा माग काढला. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी हुन्सूर परिसरातून ही कारवाई करण्यात आली.
मंडणगड पोलीस ठाण्यात १९९२ मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५/१९९२ अन्वये भारतीय दंड विधान कलम ४२९, २८६ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियमाच्या कलम ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मधुराज पुटरंग पहाडी राजपूत आणि सुब्रमणी चींनाराजू पहाडी राजपूत हे दोघेही गेल्या ३४ वर्षांपासून फरार होते.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने १५ डिसेंबर २०२५ रोजी विकसित केलेल्या ‘RAIDS App’ या AI आधारित अॅपचा या तपासात उपयोग करण्यात आला. या अॅपच्या माध्यमातून पाहिजे व फरार आरोपी तसेच हरवलेल्या व्यक्तींच्या छायाचित्रांचे १०८ विविध तांत्रिक पद्धतींनी पुनर्निर्माण करता येते. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानामुळे तपासाला मदत झाली.
या प्रकरणात अॅपच्या साहाय्याने आरोपींच्या छायाचित्रांचे पुनर्निर्माण करण्यात आले. त्यानंतर गोपनीय माहिती आणि स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्नाटकातील हुन्सूर परिसरात शोधमोहीम राबवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार विनायक राजवैद्य, सवाईराम, कदम आणि शेटे यांचा समावेश होता.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गोपनीय माहितीचे संकलन आणि पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ३४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात यश आल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













