‘आपली माणसं… आपली संस्था!’ हे ब्रीदवाक्य जपत सहकार क्षेत्रात विश्वासार्हता, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकीची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा ३३ वा वर्धापनदिन सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सहकार मेळावा, प्रगतशील शेतकरी व यशस्वी व्यावसायिकांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ ऑक्टोबर १९९३ रोजी संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या संस्थेने सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर सहकार क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. संस्थेच्या ३३ वर्षांच्या वाटचालीत आर्थिक व्यवहारांसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यावरही भर देण्यात आला आहे.
वर्धापनदिनानिमित्त सोमवारी सकाळी १० वाजता बहादूरशेखनाका येथील संस्थेच्या ‘सहकार भवन’ सभागृहात विशेष सहकार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्याला सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालयाचे माजी अपर आयुक्त एस. बी. पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे सेवानिवृत्त सहनिबंधक मिलिंद सोबले, रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट (बिळाशी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
प्रगतशील शेतकरी आणि यशस्वी व्यावसायिकांचा सन्मान
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करून प्रगती साधणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा, तसेच स्थानिक पातळीवर यशस्वी उद्योग-व्यवसाय उभारून रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या व्यावसायिकांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कृषी आणि व्यावसायिक क्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
वर्धापनदिनाच्या निमित्ताने सोमवारी सायंकाळी ४ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात चिपळूण नागरी परिवाराच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून सभासद, ग्राहक, ठेवीदार आणि हितचिंतकांना एकत्र येण्याची संधी मिळणार असून वर्धापनदिनाच्या उत्सवात सांस्कृतिक रंगत भरली जाणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमांना संस्थेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













