एल निनोच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने ‘मिशन बंधारे’ ही व्यापक लोकचळवळ हाती घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजारांहून अधिक बंधाऱ्यांची उभारणी पूर्ण झाली असून, जलसंधारणाच्या या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात १० हजारांहून अधिक वनराई आणि विजय बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज, शनिवारी (१७ ऑक्टोबर) जिल्ह्यातील गावागावांत विशेष संकल्प करून बंधारे बांधण्याची मोहीम राबवण्यात आली.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी ही माहिती दिली. त्या स्वतः विल्ये गावात बंधारा बांधण्याच्या कामात सहभागी झाल्या. तसेच, लांजा तालुक्यातील मठ येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत बंधारा बांधण्याची मोहीम राबवण्यात आली. एकाच दिवशी तीन हजारांहून अधिक बंधारे बांधण्याचा संकल्प या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आला.

या उपक्रमाला शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, बचत गटांमधील महिला, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकही या जलसंधारणाच्या कामात सहभागी होत आहेत. त्यामुळे ‘मिशन बंधारे’ ही केवळ शासकीय मोहीम न राहता लोकसहभागातून उभी राहिलेली व्यापक चळवळ बनत असल्याचे चित्र दिसत आहे.
रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे, चांदोर, भगवतीनगर आणि चवे या चार ठिकाणी एकाच दिवसात चार वनराई बंधारे यशस्वीरीत्या बांधण्यात आले. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजलपातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
प्रत्येक गावाने पुढाकार घ्यावा – वैदेही रानडे
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसंधारणाची कामे आतापासूनच हाती घेणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाने पुढाकार घेऊन लोकसहभागातून बंधारे बांधावेत आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी ‘मिशन बंधारे’च्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढल्यास पाणी अडवणे आणि पाणी जिरवणे या उद्दिष्टांना बळ मिळणार असून, ग्रामीण भागातील पाणी उपलब्धता सुधारण्यास मदत होऊ शकते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













