मंडणगड ग्रामपंचायतीची गेल्या काही वर्षांपासून थकीत असलेली पाणीपट्टी भरण्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून मुरादपूर ग्रामपंचायतीच्या ७५ वर्षीय महिला सरपंचांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत होणारी विकासकामे करू नयेत, यासाठी ठेकेदारांना धमकावत कामे केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी सरपंच फरिदा अब्दुल रझाक खल्फे यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवरून मंडणगड पोलिसांनी मुरादपूर येथील कैसर अब्दुल्ला हर्ले आणि वाहिद अलिमिया राजेखान याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत कलम ३५१(२) आणि ३५२ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता मुरादपूर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर सरपंच फरिदा खल्फे यांनी गावातील कैसर अब्दुल्ला हर्ले याच्याकडे गेल्या पाच वर्षांपासून थकीत असलेल्या पाणीपट्टीबाबत विचारणा केली.
पाणीपट्टी भरण्याबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने कैसर हर्ले आणि वाहिद राजेखान याने सरपंच फरिदा खल्फे यांना अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी सरपंचांच्या बाजूने बोलणाऱ्या काही ग्रामस्थांनाही संबंधित व्यक्तींनी शिवीगाळ आणि अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विकासकामांवरूनही धमकी दिल्याचा आरोप
या प्रकारानंतर ग्रामपंचायतीमार्फत गावात होणाऱ्या विविध विकासकामांबाबतही वाद निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ग्रामपंचायतीकडून टेंडरद्वारे कामे मिळालेल्या ठेकेदारांना धमकावून कामे करू नयेत, अशी भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“जर तुम्ही कामे केली तर तुम्हाला ठार मारून टाकू,” अशा स्वरूपाची धमकी ठेकेदारांना देण्यात आल्याचा आरोप सरपंचांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार महिला सरपंच फरिदा अब्दुल रझाक खल्फे यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कैसर अब्दुल्ला हर्ले आणि वाहिद अलिमिया राजेखान या दोघांविरोधात BNS कलम ३५१(२) आणि ३५२ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलीस निरीक्षक भरत गोविंद धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













