मंडणगड : दहागाव स्टॉपवरील किराणा दुकान फोडून रोकड लंपास

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील दहागाव किराणा मालाच्या स्टॉपवरील ‘अमीर किराणा व जनरल स्टोअर्स’ या दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजल्यापासून १ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजण्यापूर्वी घडली.

दुकान बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दुकानावरील सिमेंट पत्रे काढून आत प्रवेश केला. त्यानंतर काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली.

या प्रकरणी दुकानमालक सिकंदर इसाक जोगीलकर (वय ५६, रा. दहागाव स्टॉप, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१ (४) आणि ३०५ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


१ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी मंडणगड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *