खेड : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अग्रवाल यांनी खेड येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय तसेच विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामकाजाची सखोल पाहणी केली. मतदारांची गैरसोय होऊ नये आणि प्रारूप मतदार याद्या नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्वप्रथम खेड तहसील कार्यालयाला भेट देऊन तेथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीची पाहणी केली. तसेच नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ सहाय्यता कक्षा’च्या कामकाजाची माहिती घेतली. मतदारांना नाव तपासणे, दुरुस्ती अथवा हरकत नोंदविण्यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन वेळेत मिळावे, यावर त्यांनी भर दिला.
यानंतर त्यांनी एल. पी. इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील चार मतदान केंद्रांना भेट देऊन प्रारूप मतदार याद्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांना आपली नावे सहज तपासता यावीत, यासाठी प्रारूप मतदार यादी मतदान केंद्राच्या दर्शनी भागात स्पष्टपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
खेड पंचायत समिती कार्यालयालाही आयुक्तांनी भेट देऊन मतदार यादी प्रसिद्धी प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींशी संवाद साधत प्रारूप मतदार यादीत नागरिकांनी आपले नाव तपासणे आवश्यक असल्याचे सांगितले. मतदारांना यादी तपासण्यासाठी आणि आवश्यक दावे-हरकती नोंदवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, प्रांताधिकारी वैशाली पाटील, खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे आणि दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोम्बे उपस्थित होत्या. तसेच खेड पंचायत समितीच्या सभापती डॉ. अफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













