आई म्हणजे केवळ कुटुंबाचा आधार नसून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारी संस्कारशक्ती असते. मुलांच्या यशामागे आईचा त्याग, कष्ट, संस्कार आणि खंबीर पाठबळ यांची मोलाची भूमिका असते. अशाच मातृत्वाचा, त्यागाचा आणि संस्कारांचा गौरव पुणे येथे झालेल्या विशेष सोहळ्यात करण्यात आला.
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम यांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने प्रदान करण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय ‘आदर्श माता’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित विशेष समारंभात विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्या हस्ते ज्योती कदम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मातृत्वातील त्याग, कुटुंबासाठी केलेले योगदान, मुलांच्या जडणघडणीत बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका तसेच संस्कार आणि मूल्यांची जपणूक केल्याबद्दल त्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दूलराव जाधवर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या गौरवामुळे कदम कुटुंबाच्या मातृशक्तीचा सन्मान झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कदम कुटुंबातील योगेशदादा कदम आणि सिद्धेशदादा कदम या दोन्ही कर्तृत्ववान सुपुत्रांनी सार्वजनिक जीवनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीमागे सौ. ज्योती रामदास कदम यांनी आई म्हणून दिलेले संस्कार, मूल्यांची शिकवण, त्याग आणि खंबीर पाठबळ यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देताना त्यांनी जपलेली कुटुंबमूल्ये आणि दिलेले संस्कार या पुरस्काराच्या माध्यमातून अधोरेखित झाले आहेत.
मुलांच्या यशामागे आईची भूमिका अनेकदा पडद्यामागे राहते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासापर्यंत आईचा मोठा वाटा असतो. अशा मातांच्या योगदानाची समाजाकडून दखल घेऊन त्यांचा सन्मान होणे ही निश्चितच प्रेरणादायी बाब आहे.
ज्योती कदम यांना मिळालेला राज्यस्तरीय ‘आदर्श माता’ पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून मातृत्व, संस्कार, त्याग आणि कुटुंबासाठी केलेल्या समर्पणाचा गौरव आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या पुरस्कारामुळे कदम कुटुंबीय, नातेवाईक, हितचिंतक आणि समर्थकांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आईच्या संस्कारांची शिदोरी घेऊन मुलांनी यशाची उंच शिखरे गाठावीत आणि त्या यशामागील मातेच्या योगदानाला समाजाने योग्य सन्मान द्यावा, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून सौ. ज्योती कदम यांच्या या सन्मानाकडे पाहिले जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













