राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवा बनावटीच्या विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक आणि साठा करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी धडक कारवाई करत जेरबंद केले आहे. रोहित शिवाजी खानविलकर (वय २६, रा. खडपेवाडी, राजापूर, जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास गुजराळी दातार छापखाना ते साखळकरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दारू, दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण ८३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी परिसरात गस्त आणि कारवाई करत असताना रोहित खानविलकर हा आपल्या ताब्यातील आकाशी रंगाच्या टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीवरून (क्रमांक MH-08-BH-4768) गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची बाब निदर्शनास आली. त्याच्याकडे दारू वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
विविध ब्रँडच्या दारूचे बॉक्स जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूचा साठा जप्त केला. यामध्ये ७ हजार २०० रुपये किमतीच्या ‘हेवर्ड्स फाईन व्हिस्की’च्या पाच पेट्या असून, प्रत्येक पेटीत १८० मिलीच्या ४८ बाटल्या आहेत.
तसेच ७ हजार ८२० रुपये किमतीच्या ‘मॅकडॉवेल्स नंबर १’ कंपनीच्या गोवा बनावटीच्या दारूचाही साठा जप्त करण्यात आला. यामध्ये एका पेटीत १८० मिलीच्या ४८ बाटल्या, तर दुसऱ्या पेटीत १८० मिलीच्या ४४ बाटल्या असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दुचाकीसह दोन मोबाईलही जप्त
पोलिसांनी या कारवाईत दारूसाठ्यासोबत वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ५० हजार रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी जप्त केली. याशिवाय ८ हजार रुपये किमतीचा सिल्व्हर रंगाचा ओप्पो एफ-१९ मोबाईल आणि १० हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा सॅमसंग गॅलेक्सी ए-३५ मोबाईलही ताब्यात घेतला आहे.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ८३ हजार २० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश प्रकाश वारीक (बक्कल क्रमांक १६२५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी रोहित शिवाजी खानविलकर याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) आणि ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक करत आहेत. राजापूर परिसरात अवैध मद्य वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्री आणि वाहतुकीच्या प्रकारांवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













