सावंतवाडी शहरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न सावंतवाडी पोलिसांनी वेळीच हाणून पाडला. रेल्वे पोलिसांच्या मदतीने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर मध्यरात्री धाडसी कारवाई करत मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या तिघा तरुणांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी साई बसवेश्वर रिंजे (वय १८) आणि रोन मोहन राठोड (वय १८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिसरा एक संशयित अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी शिक्षणासाठी मुंबईत राहत होती. त्या काळात तिची एका तरुणाशी ओळख झाली होती आणि त्यांच्यात मैत्री निर्माण झाली होती. मात्र, ही मैत्री मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती. त्यामुळे पालकांनी तिला परत सावंतवाडीत आणले होते.
दरम्यान, संबंधित तरुणाने आपल्या काही मित्रांसह सावंतवाडीत येऊन मुलीला पुन्हा सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुलीला ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले होते.
मात्र, घरी परतल्यानंतर मुलीने पुन्हा त्या तरुणांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ती गुपचूप घरातून निघून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या पालकांनी तातडीने सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. संबंधित मुलं रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
रत्नागिरीत मध्यरात्री अडवले
रात्री सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोलिसांनी सापळा रचून या सर्वांना अडवले. मुलगी आणि तिघा तरुणांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी सावंतवाडीत आणण्यात आले.
या प्रकरणी दोन तरुणांविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न व अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिसरा अल्पवयीन असल्याने त्याच्याबाबत कायदेशीर प्रक्रिया वेगळी राबवली जाणार आहे.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













