दापोली : आधुनिक ई-बसला तांत्रिक ब्रेक! दापोली–खेड मार्गावर गोंधळ

Screenshot

banner 468x60

दापोली आगारातून ई-बस सेवा सुरू झाल्यापासून सर्व मार्गांवर प्रवाशांना सुखकर व पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळत आहे. मात्र, काही वेळा अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे ई-बस सेवा मध्येच बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आज दिनांक २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दापोली–खेड मार्गावरील ई-बस बजाज शोरूमसमोर अचानक बंद पडली. त्यामुळे काही काळ प्रवाशांचा खोळंबा झाला. घटनेची माहिती मिळताच दापोली आगारातून तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले व तातडीने दुरुस्ती करून बस पुन्हा मार्गस्थ करण्यात आली.

यापूर्वीही दाभोळ–दापोली मार्गावर ई-बस सेवा तांत्रिक कारणांमुळे बंद पडल्याची घटना घडली होती. अशा प्रकारचे बिघाड जर लांब पल्ल्याच्या मार्गावर झाले, तर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळ व गैरसोय होऊ शकते, असा सवाल यानिमित्ताने प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

ई-बससारख्या चांगल्या व आधुनिक सेवेचा लाभ प्रवाशांना सातत्याने मिळावा, यासाठी गाड्यांची नियमित तपासणी, देखभाल व दुरुस्ती वारंवार करणे अत्यावश्यक आहे, असे मतही प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *