दापोली : साईड देण्याच्या कारणावरून एसटी कर्मचाऱ्यांना मारहाण, तिघांविरोधात दापोलीत गुन्हा

banner 468x60

दापोली एसटी स्थानकाच्या मागील बाजूस उर्दू शाळेजवळ साईड देण्याच्या किरकोळ कारणावरून एसटी कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना १३ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १.२५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी तिघांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कर्तव्यात अडथळा निर्माण करून चालकाला शिवीगाळ तसेच वाहकाला हाताबुक्यांनी व दगडाने मारहाण केल्याचा आरोप संशयित आरोपींवर करण्यात आला आहे.

banner 728x90

याबाबत शिवनाथ बन्शी नाकाडे (वय ३४, सध्या रा. काळकाई कोड, दापोली मळ, मूळ रा. नाकाडेवाडी, पो. जाटदेवळ, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा क्रमांक ९४/२०२६ भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १३२, १२१(१), ३(५) अन्वये नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे २०२६ रोजी एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २५३८ ही बस चालक आशिष रामचंद्र मळेकर यांच्या ताब्यात होती. फिर्यादी शिवनाथ नाकाडे हे त्या बसवर वाहक म्हणून सरकारी कर्तव्य बजावत होते. संबंधित बस कोंडे-करंजाळी येथून दापोलीकडे येत असताना दुपारी सुमारे १.२५ वाजण्याच्या सुमारास दापोली एसटी स्टॅन्डच्या मागील बाजूस उर्दू शाळेजवळ हा प्रकार घडला.

बसला साईड देण्याच्या कारणावरून संशयित शेखर चंद्रकांत कालेकर (वय ४५, रा. दापोली), रंजित राजेंद्र यादव (वय १९, रा. दापोली) आणि साहिल इरशाद शार्दुला (वय १९, रा. दापोली) यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

वाद वाढल्यानंतर संशयित आरोपींनी चालक आशिष मळेकर यांना शिवीगाळ केली. तसेच वाहक शिवनाथ नाकाडे यांना हाताबुक्यांनी मारहाण करत दगडाने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेनंतर दापोली पोलिसांनी तक्रारीवरून तिघांविरोधात लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्यासाठी हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *