दापोली तालुक्यातील कुंभवे शिगवणवाडी येथे मद्यप्राशन करून भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाने रस्त्याच्या बाजूने पायी जाणाऱ्या दोन व्यक्तींना जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात सुरेश सखाराम पवार (वय ६०) आणि वसंत सखाराम कोळंबे (वय ५०, दोघेही रा. कुंभवे शिगवणवाडी, ता. दापोली) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता तसेच अपघाताची माहिती न देता चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास कुंभवे शिगवणवाडी येथील खेड-दापोली मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला. आनंद अशोक पांचाळ (वय २१, रा. महावीर चौक, ढवळे कॉर्नर, सिडको, कोठा, नांदेड) हा एमएच १४ केए ७९६२ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार घेऊन या मार्गावरून जात होता.
यावेळी त्याने मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कार अतिवेगाने आणि निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप आहे. याचदरम्यान रस्त्याच्या बाजूने पायी चालत जाणाऱ्या सुरेश पवार आणि वसंत कोळंबे यांना कारची जोरदार धडक बसली. या धडकेत दोघांनाही गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता तसेच जखमींना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी कोणतीही व्यवस्था न करता तेथून पळ काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अपघाताची माहिती पोलिसांना न देता चालक दापोलीच्या दिशेने निघून गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











