आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या जाहीर केल्या जात असल्या, तरी पश्चिम रेल्वेच्या बहुतांश विशेष गाड्या रत्नागिरीपर्यंतच मर्यादित ठेवल्या जात असल्याने दक्षिण रत्नागिरी, तळकोकण आणि सिंधुदुर्गातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावंतवाडीपर्यंत गाड्या न नेण्यामागे स्थानकावरील अपुऱ्या पायाभूत सुविधा हे कारण पुढे केले जात असल्याने आता कोकणवासीयांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) धाव घेतली आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकात अतिरिक्त प्लॅटफॉर्म, लूप लाईन तसेच गाड्यांना पाणी भरण्यासाठी आवश्यक क्विक वॉटरिंग सिस्टीम उपलब्ध नसल्याने विशेष गाड्यांचा विस्तार सावंतवाडीपर्यंत केला जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि उपनगरांतून कोकणात येणाऱ्या हजारो चाकरमान्यांना रेल्वे प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करण्याची मागणी
सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा टर्मिनस म्हणून विकास करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, आवश्यक पायाभूत सुविधांची कामे रखडल्याने त्याचा थेट फटका दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील प्रवाशांना बसत असल्याचा आरोप आहे.
ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सावंतवाडी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ चे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, लूप लाईनची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि तिलारी धरणातून पाणीपुरवठा करून चिपळूणच्या धर्तीवर क्विक वॉटरिंग सिस्टीम उभारावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात येत आहे.
यासाठी कोकणवासीयांकडून PMOच्या ऑनलाइन तक्रार प्रणालीद्वारे तक्रारी नोंदविण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाइन तक्रारी नोंदवून सावंतवाडी टर्मिनसच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
गणेशोत्सवातील तिकीट काळाबाजार रोखण्याचीही मागणी
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. आरक्षण सुरू होताच काही मिनिटांत तिकिटे उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे गणेशोत्सवातील रेल्वे तिकिटांचा संभाव्य काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही या मोहिमेत करण्यात येत आहे.
विशेष गाड्यांची संख्या वाढविण्यासोबतच त्या रत्नागिरीपुरत्या मर्यादित न ठेवता सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि सिंधुदुर्गातील प्रमुख स्थानकांपर्यंत धावाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेकडून मुंबई-मडगावदरम्यान विशेष गाड्या
दरम्यान, मध्य रेल्वेने आठवड्याच्या अखेरीस प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय करण्यासाठी मुंबई आणि मडगावदरम्यान चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ०१०२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३ आणि १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ००.२५ वाजता सुटणार असून दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचणार आहे.
तर गाडी क्रमांक ०१०३० मडगाव येथून १३ आणि १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता मुंबईत पोहोचणार आहे.
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी यांसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
गाडी क्रमांक ०१०२९ चे आरक्षण ८ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
रत्नागिरीपुढील प्रवाशांना न्याय कधी?
एकीकडे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या जाहीर होत असताना दुसरीकडे दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील प्रवाशांना पुरेशा रेल्वे सुविधा मिळत नसल्याची भावना आहे. त्यामुळे सावंतवाडी स्थानकातील प्रलंबित पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करून विशेष गाड्यांचा विस्तार तळकोकणापर्यंत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न केवळ एका स्थानकाचा नसून दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील लाखो प्रवाशांच्या वाहतुकीशी संबंधित आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी कोकणवासीयांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













