रत्नागिरी : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाची मोठी तूट आणि प्रतिकूल हवामानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीची नोंद घेत ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांना ट्रिगर-१ लागू करण्यात आला आहे.
कृषी आयुक्तांच्या अहवालाच्या आधारे दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे बाधित झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पिकांचे पंचनामे होणार
दुष्काळी परिस्थितीचा परिणाम झालेल्या तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिकांचे पंचनामे आणि सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांचे छायाचित्र, जीपीएस कोऑर्डिनेट्स आदी माहिती संकलित करून कृषी आयुक्तांमार्फत शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे.
शेतकऱ्यांना विविध सवलती
दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती आणि कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट यांचा समावेश आहे.
दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
पाणी, चारा आणि रोजगारावर भर
ग्रामीण भागातील रोजगार टिकवण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास टँकरची व्यवस्था, जनावरांसाठी चारा व पाणी, अन्नधान्याचा पुरवठा तसेच जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत.
पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणारी प्रत्यक्ष आर्थिक मदत विहित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गातील सर्व आठ तालुके दुष्काळी यादीत
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही बाब विशेष महत्त्वाची ठरली आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या सर्व आठ तालुक्यांचा ट्रिगर-१ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे खरीप हंगामातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती आणि पुढील दुष्काळी निकषांनुसार होणाऱ्या प्रशासकीय कार्यवाहीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कोकणातील तालुक्यांकडे लक्ष
रत्नागिरीतील तीन आणि सिंधुदुर्गातील आठ अशा कोकणातील एकूण ११ तालुक्यांचा ट्रिगर-१ मध्ये समावेश झाल्याने पावसाच्या तुटीचा आणि खरीप पिकांवरील परिणामाचा प्रशासकीय पातळीवर आढावा घेतला जाणार आहे.
सिंधुदुर्गातील ट्रिगर-१ लागू तालुके :
▪️ सावंतवाडी
▪️ दोडामार्ग
▪️ कणकवली
▪️ कुडाळ
▪️ वैभववाडी
▪️ मालवण
▪️ देवगड
▪️ वेंगुर्ला

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













