रत्नागिरी तालुक्यातील मौजे निरूळ गावाच्या हद्दीतील दोणी परिसरातील जंगलात एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. २५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.
मिळालेल्या माहितीनुसार, निरूळ-दोणी परिसरातील घनदाट झाडाझुडपांमध्ये एका आष्टयाच्या झाडाच्या आडव्या फांदीला पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीने एका अनोळखी इसमाने गळफास घेतल्याचे आढळून आले. मृतदेहाची अवस्था पाहता हा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
जंगल परिसरातून जात असताना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास मृतदेह आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
मृतदेह काही दिवसांपासून तेथे असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील बेपत्ता व्यक्तींबाबतची माहिती तपासली जात असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हा प्रकार आत्महत्येचा आहे की मृत्यूमागे अन्य काही कारण किंवा घातपात आहे, याबाबत सध्या निश्चित माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक ३३/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. मृताची ओळख पटविण्यासह घटनेचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













