Breaking News

खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

banner 468x60

विमुक्त व भटक्या जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी खेड तालुक्यात सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील ११ महसूल मंडळांमध्ये सकाळी ११ वाजता एकाच वेळी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार खेड तालुक्यात या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी दिली.

एकाच छताखाली विविध शासकीय सेवा

या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध दाखले, जातीचे दाखले, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, नवीन आधार नोंदणी व आधारमधील दुरुस्ती, नवीन शिधापत्रिका तसेच शिधापत्रिकेतील दुरुस्ती आणि सातबारा उताऱ्यासह विविध महसूल विषयक सेवांचा समावेश आहे.

कुठे होणार शिबिरे?

  • खेड शहर : एल. पी. इंग्लिश स्कूल (प्राथमिक विभाग)
  • चिंचघर मंडळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दस्तुरी
  • भरणे : ग्रामपंचायत कार्यालय सभागृह
  • तळे व आंबवली मंडळ : राधाकृष्ण हॉल, सुकिवली
  • लवेल व धामणदिवी मंडळ : ग्रामपंचायत कार्यालय, घाणेखुंट
  • भोस्ते मंडळ : भोस्ते ग्रामपंचायत कार्यालय
  • धामणंद मंडळ : ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, धामणंद
  • कुळवंडी मंडळ : छत्रपती शिवाजी हायस्कूल, कुळवंडी
  • शिर्शी मंडळ : ग्रामपंचायत कार्यालय, सवणस खुर्द

शिबिरांच्या नियोजनासह तळागाळातील नागरिकांपर्यंत अभियानाची माहिती पोहोचविण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि पोलीस पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

तसेच नियुक्त महा ई-सेवा आणि ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालकांनी आवश्यक संगणकीय साहित्यांसह शिबिराच्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे निर्देश तहसीलदार सुधार सोनवणे यांनी दिले आहेत.

गरजू नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या विशेष शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *