लांजा तालुक्यातील वेरवली रामगाव, लाडवाडी येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिला वैशाली विलास हेगिष्टे यांच्या खून आणि सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेल्याच्या गंभीर गुन्ह्याचा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवघ्या १२ तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणी प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) याला अटक करण्यात आली आहे. कर्जबाजारीपणामुळे हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान वैशाली हेगिष्टे या आपल्या घरी एकट्याच असताना अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या दोन्ही हातांतील सोन्याच्या दोन बांगड्या आणि दोन पाटल्या जबरदस्तीने काढून घेण्यात आल्या. विशेष म्हणजे, सोन्याचे दागिने काढल्यानंतर त्यांच्या हातात नकली बांगड्या घालण्यात आल्याचे तपासात समोर आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३०९(४) व ३३२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली. गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
त्यानुसार लांजा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या समन्वयाने तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी स्थानिक माहितीचे संकलन, संशयितांची पडताळणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास सुरू केला. पथकांमधील समन्वय आणि वेगवान तपासामुळे काही तासांतच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. त्यानंतर घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या प्रमोद खेडेकर याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान कर्जबाजारीपणामुळे हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
तीन तपास पथकांची समन्वित कारवाई
या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत उलगडा करण्यासाठी स्थानिक माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि संशयितांची पडताळणी या बाबींवर विशेष भर देण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या समन्वित कारवाईमुळे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईत पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, लांजा पोलीस ठाणे आणि राजापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
ज्येष्ठ महिलेच्या खून आणि जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या तपासातील तत्परता अधोरेखित झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













