रत्नागिरी : उपचारासाठी आलेल्या 22 वर्षीय तरुणीचा विनयभंग, डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरातील एका खासगी क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणीचा तपासणीदरम्यान विनयभंग झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात डॉ. समीर गिजबिले यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेली होती तरुणी

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीला ६ ऑक्टोबरपासून सर्दी आणि तापाचा त्रास होत होता. त्यामुळे ती उपचारासाठी डॉ. समीर गिजबिले यांच्या खासगी क्लिनिकमध्ये गेली होती. त्यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी करून इंजेक्शन आणि औषधे दिली होती. त्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

तपासणीदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप

दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मासिक पाळीच्या त्रासावरील उपचारासाठी संबंधित तरुणी आपल्या आईसोबत पुन्हा क्लिनिकमध्ये गेली होती. यावेळी तपासणी कक्षात तरुणी एकटी असताना डॉक्टरांनी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांत तक्रार

क्लिनिकमधून बाहेर आल्यानंतर तरुणीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांशी चर्चा करून तिने १६ ऑक्टोबर रोजी रात्री पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी ए. एम. कुबडे करत आहेत. तक्रारीतील आरोपांची चौकशी करून पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *