रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. वेदिका सुनील जगदाळे हिने जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. १०० मीटर धावणे आणि लांब उडी या दोन्ही क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या वेदिकाची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे साडवलीसह शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रत्नागिरी जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने १८ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा व निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वेदिकाने आपल्या वेगवान धावण्याच्या आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. १०० मीटर धावणे आणि लांब उडी या दोन्ही प्रकारांत अव्वल स्थान मिळवत तिने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. या कामगिरीच्या जोरावर तिला आता राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
साडवलीसारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारणाऱ्या वेदिकाच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या कामगिरीमुळे परिसरातील युवा खेळाडूंनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.
शाळेतील इतर विद्यार्थ्यांचेही क्रीडा क्षेत्रात यश
पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत कु. सानवी रोहन बने आणि कुमार आराध्य जागुष्टे यांनी यश मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. तसेच बुद्धिबळ स्पर्धेत कु. आरुष चव्हाण हिची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे क्रीडा शिक्षक अजय कांबळे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
महाराष्ट्रीय शिक्षण संस्था, भांडुपचे सचिव डॉ. सुभाष बने, शाळेचे संचालक डॉ. रोहन बने आणि मुख्याध्यापक सोमिनाथ मिटकरी यांनी वेदिका जगदाळे तसेच इतर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.
वेदिकाच्या दुहेरी सुवर्णपदकांच्या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून, राष्ट्रीय स्पर्धेतही ती अशीच चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













