संगमेश्वर : आरवलीत अवैध मद्य वाहतुकीवर कारवाई, दोन जण ताब्यात, ₹74,520 चा मुद्देमाल जप्त

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संगमेश्वर तालुक्यातील आरवली बाजारपेठ येथे धडक कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या आणि रिक्षासह एकूण ₹74,520 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

banner 728x90

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या आदेशानुसार अवैध मद्य वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली 31 जुलै 2026 रोजी पथक आरवली बाजारपेठ परिसरात गस्त घालत असताना एका रिक्षामधून अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

पथकाने संशयित एमएच-08-ई-8369 क्रमांकाची रिक्षा थांबवून तपासणी केली असता प्रवासी सीटवर व खालील बाजूस ठेवलेल्या दोन पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये देशी-विदेशी सिलबंद मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.

तपासादरम्यान रिक्षाचालकाने आपले नाव सुभाष भिकाजी खसासे (वय 47, रा. आरवली, ता. संगमेश्वर) तर त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीने प्रभाकर अंकुश पिलणकर (वय 54, रा. आरवली, ता. संगमेश्वर) असे सांगितले.

पोलिसांनी ₹9,520 किमतीचे देशी-विदेशी मद्य आणि ₹65,000 किमतीची रिक्षा असा एकूण ₹74,520 चा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 92/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (अ) व (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विवेक रसाळ (262), पोलीस हवालदार दीपराज पाटील (1407) आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *