चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली येथील भुवडवाडीमध्ये आईला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच तिच्या मदतीसाठी धावलेल्या ३१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अक्षय चंद्रकांत मेगे (वय ३१, रा. खांदाटपाली, भुवडवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. २८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास अक्षयची आई घराच्या पडवीत वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी गेली होती. कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या लोखंडी तारेमध्ये अचानक वीजप्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का बसताच त्या खाली कोसळल्या आणि मदतीसाठी मोठ्याने आरडाओरडा करू लागल्या.
आईचा आवाज ऐकताच घरात असलेला अक्षय क्षणाचाही विलंब न लावता बाहेर धावत आला. समोर आई जमिनीवर पडलेली असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी त्याने तात्काळ तिचा हात धरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या लोखंडी तारेमध्ये अजूनही वीजप्रवाह सुरू असल्याने अक्षयलाही तीव्र विजेचा धक्का बसला आणि तोही जागीच कोसळला.
दरम्यान, हा प्रकार शेजारी राहणारे संजय बाबू भुवड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अक्षयचा श्वास सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आणि ग्रामस्थांनी त्याला तातडीने चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. सकाळी सुमारे ९.०५ वाजता डॉक्टरांनी तपासणी करून अक्षयला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून विजेचा प्रवाह लोखंडी तारेमध्ये कसा उतरला, याचा तपास सुरू आहे.
आईला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावलेल्या अक्षयच्या मृत्यूमुळे मेगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खांदाटपाली व भुवडवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या हृदयद्रावक घटनेने प्रत्येकाचे मन सुन्न झाले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर घरातील विद्युत जोडणी, अर्थिंग आणि वीजवाहिन्यांची नियमित तपासणी करणे किती आवश्यक आहे, याची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













