रत्नागिरी : अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात रत्नागिरी पोलिसांना यश, हत्येप्रकरणी मृताचा वडील आणि भाऊ पोलीस कोठडीत

banner 468x60

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या AI आधारित RAIDS App च्या मदतीने परभणी जिल्ह्यातील एका खून प्रकरणाच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे. या ॲपच्या माध्यमातून अनोळखी मृतदेहाच्या कवटीच्या रचनेवरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने चेहऱ्याची प्रतिमा पुनर्रचित करण्यात आली. या प्रतिमेच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.


दिनांक ९ मे २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९०/२०२६ दाखल करण्यात आला होता. मृतदेहाचा चेहरा कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.


या तपासादरम्यान परभणी पोलीस दलाला रत्नागिरी पोलिसांच्या AI आधारित RAIDS App चा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ॲपच्या साहाय्याने मृतदेहाच्या कवटीच्या रचनेचा अभ्यास करून AI तंत्रज्ञानाद्वारे चेहऱ्याची प्रतिमा (Face Reconstruction) तयार करण्यात आली. ही पुनर्रचित प्रतिमा विविध ठिकाणी प्रसारित करण्यात आली. तसेच पोलीस पाटलांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याबाबत परभणी पोलिसांना मार्गदर्शन करण्यात आले.


या तांत्रिक प्रक्रियेमुळे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश आले. मृत व्यक्तीचे नाव गिताराम प्रकाश मुजमुले, रा. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी असे निष्पन्न झाले. त्यानंतरच्या तपासात या खून प्रकरणी मृताचे वडील प्रकाश सखाराम मुजमुले आणि भाऊ कृष्णा प्रकाश मुजमुले या दोघांना परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.


अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाल्याने रत्नागिरी पोलीस दलाच्या RAIDS App ची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. रत्नागिरी पोलिसांच्या तांत्रिक उपक्रमामुळे परभणीतील गंभीर गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वपूर्ण मदत मिळाली आहे.