संगमेश्वर : तालुक्यातील चाफवली येथे 45 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, फणसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील चाफवली उगवतीवाडी येथे ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. विलास दत्ताराम गावडे (वय ४५, रा. चाफवली उगवतीवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास विलास गावडे हे गुरांना खायला घालण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेतला असता, घराशेजारील वाड्यालगत असलेल्या फणसाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले.


घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विलास गावडे यांना खाली उतरवून तातडीने देवळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.


या घटनेची देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.५४ वाजता नोंद करण्यात आली आहे. विलास गावडे यांनी आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी देवरूख पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.