रत्नागिरी : बहिणीला भेटण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांविरोधात गुन्हा

banner 468x60

बहिणीला भेटण्यासाठी घरी येऊ नकोस, असे सांगितल्याचा राग मनात धरून १८ वर्षीय तरुणावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरातील खडक मोहल्ला, मिरकरवाडा येथे घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चौघांसह त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमान दाऊद दर्वे (वय १८) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. ते सध्या मिल्लत नगर, शिवाजीनगर येथे वास्तव्यास असून मच्छी सप्लायर म्हणून काम करतात. त्यांच्या तक्रारीवरून उसामा पांजरी, उबेद असलम दर्वे, बुरहान मजगावकर आणि कामरान मजगावकर (सर्व रा. मिरकरवाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, मे २०२६ मध्ये आरोपी उसामा पांजरी हा अजमान यांच्या बहिणीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी अजमान यांनी त्याला बहिणीला भेटण्यासाठी घरी येऊ नकोस, असे सांगितले होते. या कारणावरून दोघांमध्ये मिरकरवाडा येथील चिटणी बाजार परिसरात वाद झाला होता.

याच वादाचा राग मनात धरून ११ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अजमान दर्वे हे काम आटोपून खडक मोहल्ला परिसरातून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. सुरुवातीला उबेद दर्वे याने त्यांच्या हातातील मोबाईलला धक्का देत वाद घातला. त्यानंतर त्याने फोन करून इतर आरोपींना घटनास्थळी बोलावून घेतल्याचा आरोप आहे.

काही वेळातच आरोपींसह त्यांचे इतर साथीदार तेथे पोहोचले. सर्वांनी मिळून अजमान यांचा टी-शर्ट पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी उबेद दर्वे याने रस्त्यावरील दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच इतर आरोपींनी हाताने मारहाण करत त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीदरम्यान आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली तसेच अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत अजमान दर्वे यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संबंधित आरोपी आणि त्यांच्या साथीदारांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मिरकरवाडा परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *