रत्नागिरी : शेतात सर्पदंश झालेल्या वृद्धेचा कोल्हापुरात उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

शेतात काम करत असताना सर्पदंश झाल्याने गंभीर प्रकृतीत कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

अनिता अनंत उभारे (वय ६०, रा. धोपटवाडी, गोळप, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिता उभारे या १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गोळप येथील शेतात काम करीत होत्या. यावेळी त्यांना सापाने दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी १८ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच १५ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद प्रथम कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली. त्यानंतर हा प्रकार झिरो नंबरने पूर्णगड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी पूर्णगड पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत असून, मृत्यूच्या घटनेची नोंद व संबंधित कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *