रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार, कोकण बँकेचे संचालक आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले जावेद मुजावर (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत आहे.
जावेद मुजावर हे गेल्या अनेक वर्षांपासून कोकण बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी एस.टी. महामंडळाच्या सेवेत काम केले असून तेथून ते निवृत्त झाले होते. नोकरीच्या जबाबदाऱ्यांसोबतच त्यांना पत्रकारितेची विशेष आवड होती.
रत्नागिरीतील प्रसिद्ध ‘केटीव्ही न्यूज’ वृत्तवाहिनीसाठी त्यांनी काही काळ पत्रकार म्हणून काम केले. स्थानिक प्रश्न, सामाजिक विषय आणि विविध घडामोडींचे वार्तांकन करताना त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
शांत, प्रेमळ, दिलदार आणि मनमिळाऊ स्वभावामुळे जावेद मुजावर यांचा विविध क्षेत्रातील नागरिकांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. पत्रकारिता, सहकार तसेच सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मित्र, सहकारी, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहिणी आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी लांजा येथील मूळ निवासस्थानी पार पडणार आहे.
जावेद मुजावर यांच्या निधनाने पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रातील एक आपुलकीचा सहकारी गमावल्याची भावना व्यक्त होत असून, विविध क्षेत्रांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













