किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. खर्चासाठी मागितलेल्या दोन हजार रुपयांवरून संतापलेल्या मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांनाच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलल्याची धक्कादायक घटना कुवारबाव येथे घडली आहे. या घटनेत वडील गंभीर जखमी झाले असून, आरोपी मुलाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज प्रभाकर सणस (वय ५३, रा. वाई, सातारा; सध्या कुवारबाव) हे कुकिंगचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. २५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ते आणि त्यांचा मुलगा प्रणय सणस हे संगम हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका पडीक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बसले होते. यावेळी प्रणयने वडिलांकडे खर्चासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली.
मात्र, मनोज सणस यांनी आपल्या जवळ एवढी रक्कम नसल्याचे सांगत केवळ २०० रुपये देण्याची तयारी दर्शवली. या उत्तराने संतापलेल्या प्रणयचा राग अनावर झाला. त्याने वडिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला केवळ वादावादी असलेला हा प्रकार काही क्षणांतच हिंसक झाला.
प्रणयने संतापाच्या भरात वडिलांवर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. या झटापटीत मनोज सणस यांचा तोल गेला आणि ते थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. खाली पडल्याने त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. या भीषण घटनेनंतर आरोपी मुलगा घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.
जखमी अवस्थेत मनोज सणस रात्रभर त्याच ठिकाणी पडून होते. वेदनेने तडफडत असतानाही त्यांना तत्काळ मदत मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी, २६ एप्रिल रोजी त्यांनी कशीबशी आपल्या मित्राशी संपर्क साधला. ही माहिती मिळताच त्यांचे मित्र दीपक घाटगे यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला आणि जखमी सणस यांना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी मनोज सणस यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यांच्या जबानीच्या आधारे आरोपी प्रणय मनोज सणस याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२५(अ), ३५२, ३५१(२), १३१ आणि १२५(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे कुवारबाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्वतःच्या वडिलांवरच मुलाने असा जीवघेणा हल्ला केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून, पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













