मंडणगड : अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांचा AI चा आधार

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील जिपोळे आणि उमरोली जेट्टीदरम्यान सावित्री नदी व बाणकोट खाडीच्या पात्रातील खाजन परिसरात ९ जुलै २०२६ रोजी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह सापडून महिना उलटूनही त्याची ओळख पटलेली नसल्याने रत्नागिरी पोलिसांनी आता अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा आधार घेत मृत व्यक्तीची ओळख पटविण्याची मोहीम सुरू केली आहे.

banner 728x90

मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून तो पुरुष आहे. मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या अंगावरील कपडे आणि शरीरावरील विशेष खुणांची नोंद केली आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर मळलेला आणि फाटलेला पूर्ण बाह्यांचा शर्ट, निळ्या रंगाची पूर्ण लांबीची पँट तसेच लेदरचा बेल्ट आढळून आला. त्याने निळ्या रंगाची पूर्ण लांबीची अंतर्वस्त्रेही परिधान केली होती.

मनगटावरील टॅटू ठरू शकतो ओळखीसाठी महत्त्वाचा

मृत व्यक्तीच्या उजव्या मनगटावर निळ्या रंगाचा हृदयाच्या आकाराचा टॅटू आहे. या टॅटूमध्ये काही अक्षरे किंवा विशिष्ट खुणा कोरलेल्या आहेत. मात्र अक्षरे अस्पष्ट असल्याने त्यांचं स्पष्ट वाचन होत नाही. त्यामुळे हा टॅटू मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, असा पोलिसांचा अंदाज आहे.

या घटनेची माहिती बाणकोट पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मितेश केणी यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिल्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू करण्यात आले.

‘RAIDS’ ॲपच्या माध्यमातून AI ची मदत

रत्नागिरी पोलीस दलाने विकसित केलेल्या ‘RAIDS’ अर्थात Rapid AI-based Identification & Detection System या ॲपचा यासाठी वापर करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेहाचे उपलब्ध छायाचित्र RAIDS ॲपवर अपलोड करण्यात आले.

यानंतर AI आधारित प्रक्रियेद्वारे उपलब्ध छायाचित्राच्या आधारे मृत व्यक्तीचे संभाव्य स्वरूप दाखविणाऱ्या विविध AI-reconstructed images तयार करण्यात आल्या आहेत. या प्रतिमांच्या माध्यमातून मृत व्यक्तीची ओळख पटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून प्रतिमा प्रसारित

मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या AI-reconstructed images प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.

मृत व्यक्ती मंडणगड किंवा रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे, तर इतर कोणत्याही भागातील असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून ही माहिती व्यापक पातळीवर प्रसारित केली जात आहे. त्यामुळे प्रसारित करण्यात येणाऱ्या AI प्रतिमांमधील व्यक्ती कोणाच्या परिचयाची असल्यास किंवा त्याबाबत कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माहिती मिळाल्यास बाणकोट पोलिसांशी संपर्काचे आवाहन

या मृत व्यक्तीबाबत कोणत्याही नागरिकाला माहिती असल्यास, तसेच AI-reconstructed images पाहून व्यक्तीची ओळख पटत असल्यास तात्काळ बाणकोट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे.

मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून पारंपरिक तपासासोबतच आधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, या माध्यमातून तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *