रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव टेम्पोची इनोव्हा कारला धडक, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी-कोकजेवठार परिसरात भरधाव टेम्पोने इनोव्हा कारला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघाताप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार भार्गव निमकर हे त्यांची इनोव्हा क्रिस्टा कार (क्र. MH 08 AN 3020) चालवत देवरुख-आंबव मार्गे रत्नागिरीच्या दिशेने येत होते. त्यांच्यासोबत अजिंक्य एकनाथ मोरे हेही प्रवास करत होते. दुपारी साडेचारच्या सुमारास ते निवळी-कोकजेवठार परिसरात पोहोचले असता हा अपघात घडला.

यावेळी निवळी फाटा ते बावनदी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून येणारा टेम्पो (क्र. MH 40 DC 2032) चालक सुरज सुरेश वाढवे याने वाहन हयगयीने, बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने चालवत इनोव्हा कारच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाले.

या घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण मोटार अपघात अर्ज क्र. २५/२०२६ अन्वये चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर २४ जुलै रोजी रात्री १० वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी चालक सुरज सुरेश वाढवे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *