रत्नागिरी : गणपतीपुळे मंदिरात भाविकांसाठी आता ‘ड्रेस कोड’ लागू

banner 468x60

कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारी २०२७पासून वस्त्रसंहिता बंधनकारक करण्यात आली आहे. तशा स्वरूपाचा सूचनाफलक संस्थानकडून मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. या निर्णयाची पूर्वकल्पना गणेशभक्तांना, पर्यटकांना काही महिने आधीच देण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने याबाबत मंदिर परिसरात फलक लावले आहेत. भाविकांनी वस्त्रसंहितेसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत. वस्त्रसंहिता यापूर्वीच लागू करण्यात आली होती. मात्र १ जानेवारीपासून तिची कडक अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती गणपतीपुळे संस्थानचे ट्रस्टी डॉ. विवेक भिडे यांनी दिली. खालील नियम पाळावेत…

  • कमी कपड्यातील, सहलीच्या मूडचा अथवा समुद्रावर जाण्यासाठी करण्यात येणारा पेहराव टाळावा
  • गुडघ्याच्या वर येणारे स्कर्ट किंवा ड्रेस परिधान करू नयेत
  • असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्रे असलेले कपडे टाळावेत

अशा कपड्यातील मंडळींना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश निषिद्ध असेल व त्याकरिता आम्हाला भीड घालू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दहा वर्षांच्या आतील मुलांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे. या सगळ्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी पुढील वर्षापासून केली जाणार आहे.

‘येथे येणारा प्रत्येक भाविक हा सात्त्विक व प्रसन्न मनाने येथे येईल. त्यातून आपली संस्कृती जपली जाईल. या ठिकाणचे पावित्र्य अबाधित राहील, यासाठी श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत गणेशभक्तांकडून करण्यात येत आहे,’ अशी प्रतिक्रिया गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी दिली आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाप्पाचं दर्शन अन् पिकनिकही असा विचार करुन येणाऱ्या भाविकांची तारांबळ उडणार आहे. मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन संस्थानातर्फे करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *