राजापूर तालुक्यातील कोदवली–रानतळे–धारतळे–रत्नागिरी मार्गावर मंगळवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसची धडक होऊन अपघात झाला. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने एका बसचा ताबा सुटून ती समोरून येणाऱ्या बसवर आदळली. मात्र दोन्ही चालकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर आगाराची राजापूर–पेंडखळे–चिपटेवाडी मार्गावरील एसटी बस चालक सतीश हजारे व वाहक बी. डी. सरनाईक यांच्यासह चिपटेवाडीकडे जात होती. त्याचवेळी कशेळी–राजापूर मार्गावरील एसटी बस चालक संतोष इंगळे व वाहक दळवी हे राजापूरकडे येत होते.
रानतळे परिसरातील उतारावर समोरून येणारी बस दिसताच कशेळी–राजापूर बसच्या चालकाने ब्रेक लावला. मात्र मुसळधार पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने बस घसरली आणि समोरून येणाऱ्या बसवर आदळली. यावेळी चिपटेवाडी बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला घेतल्याने अपघाताची तीव्रता कमी झाली आणि मोठी जीवितहानी टळली.
अपघातानंतर दोन्ही बसमधील प्रवाशांना पर्यायी एसटी बसची व्यवस्था करून त्यांच्या पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
दरम्यान, या मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडाझुडपांमुळे समोरून येणारी वाहने वेळेत दिसत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यामुळे या रस्त्यावरील झाडी तातडीने हटवून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













