मंडणगड : ‘माझ्या कुत्र्याला का मारले?’ असा जाब विचारत 64 वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण, डोक्यात काठीने वार

banner 468x60

भाताच्या कापलेल्या पिकाची राखण करत बसलेल्या ६४ वर्षीय वृद्धाला ‘माझ्या कुत्र्याला का मारले?’ असा जाब विचारत तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंडणगड तालुक्यातील सडे जाधववाडी येथे घडली आहे. या मारहाणीत वृद्धाच्या डोक्याला काठीने गंभीर दुखापत झाली असून, त्यांना अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सडे जाधववाडी येथील रहिवासी दत्ताराम परशुराम जाधव (वय ६४) हे गावातील बंद असलेल्या अंगणवाडीच्या आवारात त्यांचे साडू दिनकर सिताराम पवार यांच्या कापलेल्या भातपिकाची राखण करत बसले होते. सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याच वाडीतील अल्पेश सोपान जाधव हा तेथे आला.

यावेळी अल्पेश जाधव याने दत्ताराम जाधव यांना ‘तू माझ्या कुत्र्याला का मारलेस?’ असा जाब विचारत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद वाढत असतानाच वाडीतील समाधान तुकाराम जाधव आणि सोपान सिताराम जाधव हे दोघेही घटनास्थळी आले.

त्यानंतर तिघांनी मिळून दत्ताराम जाधव यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान अल्पेश जाधव याने हातातील लाकडी काठीने दत्ताराम यांच्या डोक्यावर, कपाळाच्या वरील बाजूस जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दत्ताराम जाधव जखमी झाले. त्याचवेळी समाधान जाधव आणि सोपान जाधव यांनीही त्यांना हाताच्या ठोशांनी मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत जखमी झालेल्या दत्ताराम जाधव यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अल्पेश सोपान जाधव, समाधान तुकाराम जाधव आणि सोपान सिताराम जाधव या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२६ नोंदविण्यात आला असून, पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *