दापोली : खेर्डी माळवाडीत केळकर कुटुंबाच्या सहकार्यातून वनराई बंधारा, पाणी संवर्धनाला हातभार

banner 468x60

प्रतिनिधी : सागर गोवळे
पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरवण्याच्या उद्देशाने दापोली तालुक्यातील खेर्डी माळवाडी येथे नव्या वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. ‘श्री स्वामी अर्थमुव्हर्स खेर्डी माळवाडी’ यांच्या जेसीबीच्या सहाय्याने तसेच पांडुरंग केळकर, प्रशांत केळकर आणि प्रितम केळकर यांच्या विशेष सहकार्यातून हा लोकाभिमुख उपक्रम पूर्ण करण्यात आला.


पाणी संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन केळकर कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या सहकार्यातून साकारलेल्या या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी साठवणुकीला चालना मिळणार असून, भूजल पातळी वाढण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.


या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याचा उपयोग परिसरातील महिलांना कपडे धुण्यासाठी होणार असून, आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांमधील पाळीव जनावरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी परिसरातील वन्यप्राणीही या पाणवठ्यावर येत असल्याने त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.


ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच पाणी अडवणे आणि जिरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा छोट्या पण परिणामकारक उपक्रमांमुळे जलसंधारणाला बळ मिळते. खेर्डी माळवाडी येथे केळकर कुटुंबाने घेतलेला पुढाकार सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा चांगला आदर्श ठरत असून, त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *