खेड : कपडे धुण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 80 वर्षीय वृद्धेचा दोन दिवसांनंतर नदीपात्रात मृतदेह, जगबुडी नदीत आढळला मृतदेह

banner 468x60

कपडे धुण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या ८० वर्षीय वृद्धेचा दोन दिवसांनंतर जगबुडी नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आल्याने खेड परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मी गोविंद भोसले (वय ८०, रा. महाडनाका, खेड) असे मृत वृद्धेचे नाव आहे. मंगळवारी (३ नोव्हेंबर) सकाळी गुलमोहर पार्क परिसरातील जगबुडी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.


मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी भोसले या स्वतःच्या साड्या धुण्यासाठी घरातून बाहेर पडून जगबुडी नदीवर गेल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी परतल्या नाहीत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्या घरी न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी परिसरात तसेच संभाव्य ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.


वृद्ध महिला अचानक बेपत्ता झाल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केले असावे, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. यानुसार १ नोव्हेंबर २०२६ रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा शोध सुरू होता.


दरम्यान, मंगळवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गुलमोहर पार्क परिसरातील जगबुडी नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाण्यात पालथ्या अवस्थेत असल्याचे तसेच शरीरातून दुर्गंधी येत असल्याचे पोलिसांकडे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.


घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटविण्याची कार्यवाही करून पुढील प्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ९३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.


लक्ष्मी भोसले यांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला? नदीत पडून त्यांचा मृत्यू झाला की यामागे अन्य काही कारण आहे? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांच्या पुढील तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे महाडनाका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *