Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

लांज्यात धावत्या टोयोटा कारला भीषण आग, चालकाचा थरारक बचाव, कार खाक

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनारी येथे ट्रक जळून भस्मसात झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री लांजा-आसगे-तळवडे-दाभोळे मार्गावर धावत्या टोयोटा कारला अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली. तळवडे फाट्यानजीक झालेल्या या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, चालकाने वेळीच वाहनाबाहेर पडत प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय गोपाळ केतकर (वय ६३, रा. मार्लेश्वर फाटा, देवरुख, ता. संगमेश्वर) हे त्यांच्या टोयोटा कार (एमएच ०१ एफबी ३७७४) मधून लांजाहून देवरुखकडे जात होते. रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास तळवडे फाट्यानजीक पोहोचताच वाहनातून अचानक मोठा आवाज येऊ लागला आणि इंजिनच्या भागातून धूर निघू लागला.

धोक्याची चाहूल लागताच केतकर यांनी तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पडत स्वतःचा बचाव केला. काही क्षणांतच कारने पेट घेतला आणि आगीने भीषण स्वरूप धारण केले. आग इतक्या वेगाने पसरली की काही मिनिटांतच संपूर्ण कार ज्वाळांच्या विळख्यात सापडून पूर्णपणे जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार उर्मिला शेडे तसेच पोलीस शिपाई स्वप्निल कदम आणि उमाजी बजागे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.

दरम्यान, आग विझविण्यासाठी देवरुख नगरपंचायतीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

अंजनारी येथे ट्रक जळून भस्मसात झाल्याच्या घटनेनंतर अल्पावधीतच पुन्हा एकदा वाहनाला आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली असून, वाहनांमधील तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी नियमित तपासणीचे महत्त्वही समोर आले आहे. या घटनेचा पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *