खेड : हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्यावरून वाद, तरुणाचा पाठलाग करून हॉटेलमध्ये घुसून मारहाण

banner 468x60

खेड येथे वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाचा पाठलाग करून हॉटेलमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना खवटी येथे घडली. याप्रकरणी अमोल दळवी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पाखरवाडी, खवटी) याच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी अभय गौतम धोत्रे (वय २३, रा. नातुनगर, वावे फाटा प्रकल्प वसाहत, बौद्धवाडी, खेड) हे त्यांचा मित्र योगेश विटले यांच्यासोबत बोरघर येथील चायनिज सेंटरसमोर वाहनावर बसले होते.

यावेळी आरोपींच्या ताब्यातील पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेटची बोलेरो (क्र. एपी-०५०९, पूर्ण क्रमांक माहीत नाही) तेथून जात असताना तिच्या हेडलाईटचा प्रकाश फिर्यादी यांच्या डोळ्यावर पडला. याबाबत फिर्यादी यांनी वाहनातील व्यक्तींना विचारणा केली. याचा राग मनात धरून संबंधितांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राचा पाठलाग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पाठलाग करत आरोपी खवटी येथील एनएच-६६ महामार्गालगत असलेल्या सुरुची हॉटेलमध्ये शिरले. हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आतील भागापर्यंत फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला हाताने तसेच प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत दोघांना दुखापत झाली.

दरम्यान, फिर्यादी यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी अभय धोत्रे यांच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी अमोल दळवी याच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध बेकायदेशीर जमावासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *