छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि इतिहासाचा जागर व्हावा, तसेच मंदिरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा असाव्यात, या उद्देशाने शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून अखंडित व अमर्यादित महाउपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथील प्रसिद्ध बल्लाळ गणेश देवस्थानात करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधील ग्राममंदिरे, पुरातन व प्राचीन मंदिरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा भेट देण्यात येणार आहेत. त्यासोबत शिवचरित्र आणि शिवविचार पत्रिकाही मंदिरांना देण्यात येणार आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रभानवल्ली येथील बल्लाळ गणेश मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शिवचरित्र आणि शिवविचार पत्र भेट देऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रभानवल्ली परिसराचा ऐतिहासिक वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेले विविध संदर्भ लक्षात घेता, या ठिकाणाहून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी बल्लाळ गणेश देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा अभिनेते अमोल रेडिज यांचा शिवसंघर्ष संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. अमोल रेडिज यांनी राजा शिवाजी, हिरकणी यांसह विविध चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
तसेच महाराष्ट्रभर गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र राज्य – पालघर विभाग आणि रत्नागिरी विभागातील सदस्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मयुर गोसावी, सचिव प्रीती गुरव, खजिनदार स्वप्नील गोसावी, सदस्य अभिजित गोसावी, रोहित बेंडल, अविनाश साटले यांच्यासह शिवसंघर्ष परिवारातील सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, हा उपक्रम आगामी काळातही अखंडित सुरू राहणार असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध मंदिरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा भेट देण्यात येणार आहेत. मंदिरांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवचरित्र आणि त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











