कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता, सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला व बालकांची सुरक्षा, वाहतूक नियम आणि सामाजिक सलोखा याबाबत नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन प्रबोधन’ हा अभिनव नागरिकाभिमुख उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस ठाणे किंवा कार्यालयापुरता मर्यादित न राहता ग्रामसभेपासून थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत यापूर्वी विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून जवळपास १५ लाख नागरिकांपर्यंत सुरक्षितता आणि कायद्याबाबतचा संदेश पोहोचविण्यात आला आहे. आता या जनजागृतीला अधिक व्यापक स्वरूप देत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ‘मिशन प्रबोधन’च्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ग्रामसभांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या, अडचणी, सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या स्थानिक बाबी जाणून घेऊन त्यावर आवश्यक मार्गदर्शन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली जाणार आहे.
सायबर फसवणुकीपासून अमली पदार्थांपर्यंत जनजागृती
‘मिशन प्रबोधन’मध्ये कायदेशीर हक्क आणि नागरिकांची कर्तव्ये, सायबर सुरक्षा, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला व बालकांची सुरक्षा, वाहतूक नियम, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
पोलीस दलाकडून यापूर्वी राबविण्यात येत असलेल्या विविध जनजागृती आणि नागरिकाभिमुख उपक्रमांना या अभियानाच्या माध्यमातून एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
AI आणि डिजिटल माध्यमांचा वापर
या अभियानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. कायदेशीर तरतुदी, सायबर सुरक्षेचे नियम, ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाचे उपाय आणि अन्य सुरक्षा विषयक माहिती नागरिकांना सहज समजावी यासाठी AI आधारित तंत्रज्ञान, सोशल मीडिया, व्हिडिओ, अॅनिमेशन, माहितीपट आणि संवादात्मक डिजिटल कंटेंटचा वापर करण्यात येणार आहे.
रत्नागिरी पोलीस दलाने यापूर्वीही तंत्रज्ञानाधारित पोलीसिंगला प्राधान्य दिले आहे. AI-powered RAIDS App, GIS-based बंदोबस्त App आणि ‘रत्नसेतु’ AI Assistant यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर नागरिकाभिमुख पोलीस सेवेसाठी करण्यात आला आहे.
प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
ग्रामसभा, शाळा-महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक, विविध स्थानिक संस्था आणि नागरिकांच्या माध्यमातून पोलीस आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.
‘पोलीस तुमच्या दारी’ या भावनेतून जनजागृतीचा प्रवास ग्रामसभेपासून घराघरापर्यंत नेण्याचा प्रयत्न म्हणजे ‘मिशन प्रबोधन’, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खेडे-पाडा आणि प्रत्येक नागरिकापर्यंत सुरक्षितता, कायद्याचे ज्ञान आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश पोहोचविण्यावर या अभियानाचा भर राहणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













